रसग्रहण - रोम आणि पॅरिसमधील काही आगळी वेगळी ठिकाणे
गेल्या काही वर्षात मी बघितलेल्या पॅरिस आणि रोममधील फारश्या ठाऊक नसलेल्या काही जागांचा हा एक धावता परिचय आहे. विशेष गर्दी नसल्याने या जागा निवांतपणे बघता येतात आणि तिथल्या वातावरणाशी, कलावस्तुंशी एकरूप होऊन रसग्रहण करणे सहज शक्य होते.
१. रोम: कोलोना प्रासाद आणि संग्रहालय: Palazzo Colonna,
रोमच्या इतिहासातील निवडक मातब्बर घराण्यांपैकी असलेले ‘कोलोना’ घराणे चौदाव्या शतकापासून या भव्य प्रासादात आजतागायत वास्तव्य करून आहे.
हा प्रासाद/संग्रहालय आपल्यासारख्या पर्यटकांसाठी फक्त शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ याच वेळात खुला असतो, असे रोमचे तिकीट काढण्याआधीच कळलेले असल्याने मी त्याप्रमाणे प्रवासाचा बेत आखलेला होता. मुसळधार पाऊस-वाऱ्यात कशीबशी छत्री सांभाळत साडेआठलाच मी तिथे पोचलो. स्वागत कक्ष अगदी लहान असल्याने तिथल्या एकुलत्या एक खुर्चीवर मी बसलो. थोड्याच वेळात दाखल झालेल्या इतर पंधरा-वीस रसिकांना मात्र बाहेर पावसातच थांबावे लागले. नऊला आत शिरल्यावर या प्रासादाच्या मुख्य दालनाची भव्यता, ऐश्वर्य आणि सौंदर्य बघून मी अवाक झालो.
प्रासादातील काही खाजगी दालने ठराविक वेळेत आठ- दहांच्या समूहात मार्गदर्शकाबरोबरच बघता येतात. ही दालने अनेक शतकांपासून जशीच्या तशी जतन केलेली आहेत. (ही बघताना आमच्या इंदूरच्या होळकरांच्या महालांची (आताचे नाव: ‘नेहरू केन्द्र’) झालेली दुर्दशा, तिथून चोरी होऊन परदेशात पहुचलेल्या कलाकृती, हे सर्व आठवून बेचैन झालो)
No comments:
Post a Comment