Wednesday, August 29, 2012

मी चित्रकार कसा बनलो ... काही आठवणी.


मी एक चित्रकार...
.... अमुक एका ठिकाणी पोचायचे म्हणून नव्हे, तर निव्वळ आवड म्हणून माळरानावर, राना-वनात भटकंती करणारा, जे आवडेल, ते चित्रात, शब्दात मांडणारा एक प्रवासी.... माझं जीवन हे सुध्धा अशीच एक निरुद्देश भ्रमंती... यात जे जे काही बघता-करता आलं, ज्यात मी काही काळ का होईना, रमून गेलो, त्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न ...
चांदोबा, मेणबत्ती आणि निसर्ग ....इंदूर मध्ये ३० सप्टेंबर १९५१ रोजी जन्मलो.
जन्मापासून सव्वीसाव्या वर्षापर्यंत माळव्यात, इंदुरात वाढलो, पण मध्यंतरी सातवी ते नववी महाराष्ट्रात सांगली जवळच्या माधवनगरात होतो. सातवीत असताना एकदा एक चित्रकार शाळेत आला होता, सर्व वर्गातले फळे एकत्र करून ते शाळेच्या मोठ्या हॉलमध्ये मांडले, त्यावर त्या चित्रकाराने इंजिनियर, डॉक्टर, वकील, लेखक, चित्रकार, व्यापारी, अशी खडूने रेखाचित्रे काढली. मग आम्हा सर्व विद्यार्थांना एक एक मेणबत्ती देऊन सांगितले, कि तुम्हाला मोठेपणी जे व्हावेसे वाटते, त्या चित्रासमोर मेणबत्ती लावा... बहुतेक मेणबत्त्या इंजिनियर, डॉक्टर वगैरेंच्या चित्रांसमोर लागल्या. चित्रकाराच्या चित्रासमोर लागलेली एकुलती एक मेणबत्ती माझी होती... हा प्रसंग मी पुढे पार विसरून गेलो होतो, पण मी चाळीसेक वर्षांचा झाल्यावर एका दिवशी तो अचानक आठवला...
मेणबत्ती तर लावली, पण चित्रकला कुठे, कशी शिकायची, काहीच ठाऊक नव्हते. मामांकडून कळले, की गावात जांभळीकर म्हणून उत्तम चित्रकार आहेत, त्यांच्याकडे गेलो, ते म्हणाले तू येत जा, मी तुला शिकवेन. मग एकदोनदा गेलो, तेंव्हा त्यांची मुलगी मला म्हणाली, कि तू माझा भाऊ आहेस. मी तुझ्याकडे खेळायला येईन, मग ती खरोखरच संध्याकाळी घरी आली. माझी इतकी घाबरगुंडी उडाली, कि मी पुन्हा जांभळीकरांकडे गेलोच नाही. वर्गातील मुले चिडवतील, ही भिती. मग आठवीत चित्रकला शिकवायला जोशी मास्तर आले, ते वर्गात माझ्या चित्रांची तारीफ करायचे. त्यांच्या प्रोत्साहनाने एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. त्यावेळी प्रत्यक्ष फुले-पाने बघून रंगवणे, मेमरी ड्रोईन्ग, वगैरे विषय असायचे.
तेंव्हा चांदोबा मासिकातली चित्रे फार आवडायची, ती बघून काढायचो, शिवाय वाद्ये वाजवणे, जादूचे खेळ, निसर्ग भ्रमंती आणि भरपूर वाचन हेही करायचो. आम्ही दर महिन्याला चांदोबाची आतुरतेने वाट बघायचो. त्यातील अप्सरांची, देवी देवतांची, ग्रीक, चीनी, अरबी वगैरे वातावरणाची चित्रे यातून एक अद्भुत विश्वच उलगडत जायचं. चांदोबातून बघून चित्र काढताना आपल्याला हे जमतंय, याचा आनंद मोठा होता, त्यापलीकडे काहीच ठाऊक नव्हते.
तीन वर्षे माधवनगरला राहिल्यावर १९६६ साली परत इंदुरात आलो. पुन्हा पूर्वीचे घर, मित्र, परिचित वातावरण, पण आता बाल्य संपून पौगंडावस्थेत आलेलो होतो. आतून काहीतरी सळसळत होते, अस्वस्थ करत होते, आंतरिक उर्जा जागृत होत होती....
माझे आई वडील पूर्वी नर्मदेकाठी धारडीच्या जंगलात झोपडी बांधून काही काळ राहिले होते, वडिलांना जंगलात फार आवडायचे. त्या काळच्या लहानश्या इंदुरातही त्यांना गुदमरल्यासारखे व्हायचे, मग ते नेहमी आम्हा मुलांना पाताळपाणी, सिमरोल वगैरे भागातील डोंगर, धबधबे, जंगले, अश्या जागी फिरायला न्यायचे. ते डोहातल्या पाण्यावर तासनतास अगदी निश्चलपणे पडून राहायचे. इंदूरच्या आसपास तेंव्हा बरेच जंगल होते. जंगलात भटकण्याचे आकर्षण मला तेंव्हापासून आजतागायत आहे. जंगलाच्या एकांतात, झाडांच्या, खडकांच्या सान्निध्यात आपला अहंकार, आपल्या अपेक्षा, आणि त्यासंबंधित सगळे क्लेश विरून जातात, आणि एक निखळ आनंदाची, समाधानाची स्थिती अनुभवास येते.
एकदा वडिलांबरोबर सायकलने फिरताना एक ओढा पार केला, जवळच एक तुटका पूल होता, भोवताली सर्वत्र हिरवळ, झाडी. पावसाळ्याचे दिवस. अगदी भारून टाकणारे वातावरण होते. बरोबर कागद, रंग नेले होते. मग तिथल्या चिखलात त्यातल्या त्यात जरा कोरडी जागा बघून चित्र काढायला बसलो. माझ्या अगदी सुरुवातीच्या निसर्ग चित्रांपैकी हे एक. पुलाच्या तुटक्या विटा वगैरे अगदी तपशीलात जाऊन रंगवल्या होत्या. त्याच दिवशी अगदी संध्याकाळ होईपर्यंत आणखी दोन चित्रे रंगवली. अगदी धन्य धन्य वाटले.
म्याट्रिक म्हणजे दहावीत असताना मला दोन खास मित्र लाभले. सुनील आणि प्रकाश व्यवहारे. माझ्यामुळे सुनीलला पण चित्रकलेची लागण होऊन आम्ही दूर दूर जंगलात सायकलने जाऊन भटकंती, पोहणे, चित्रे काढणे वगैरेचा सपाटा लावला. प्रकाश अतिशय हुशार आणि अभ्यासू. पुढे तो इंदूरच्या इंजिनियरिंग कॉलेजात प्रोफेश्वर झाला, पण तेंव्हा मात्र मी त्याच्या वर्गाच्या बाहेर उभा राहून त्याला खुणेनी बोलावले, की तो वह्या-पुस्तके तिथेच सोडून बाहेर यायचा, आणि आम्ही भटकंतीला निघायचो. वडिलांचा धाक आणि शिस्त, अभ्यास एके अभ्यास, यातून तो माझ्या संगतीने बाहेर पडून भटकंती, संगीत, चित्रकला, वाचन यातही रमू लागला. त्यावेळी आम्ही दोघांनी दासबोध अनेकदा आवडीने वाचल्याने त्यातल्या अनेक ओव्या अजून तोंडपाठ आहेत. मी दासबोधाच्या शैलीत 'त्रासबोध' देखील लिहीत असे.
आर्टस्कूल आणि इंजिनियरिंग कॉलेज१९६८ मध्ये सतरा वर्षांचा असताना एकदा स्कूल ऑफ आर्ट मध्ये गेलो, बरोबर चांदोबातून बघून काढलेली, आणि तेंव्हाच्या साधना, मुमताज वगैरे नट्यांची चित्रे होती. प्रिन्सिपल किरकिरे होते, ते म्हणाले की तुमचा हात चांगला आहे, पण आता ही अशी बघून चित्रे काढायची नाहीत, अमुक इतकी फी भरून प्रवेश मिळेल. उद्यापासून या. मग काय, आनंदाला उधाण आले. लगेच जाणे सुरु केले.
शाळेचा अभ्यास मी फारसा कधी करत नसे, पण फिजिक्स, भूमिती आणि गणितात चांगली गती होती. १९६९ साली अकरावी झाल्यावर तेंव्हाच्या रूढ चाकोरीप्रामाणे इंदूरच्या इंजिनियरिंग कॉलेजात पण दाखल झालो. तेंव्हा प्रवेश परीक्षा वगैरे भानगडी नव्हत्या. दोन तीन मित्र आपापली मार्कलिस्ट घेऊन गेलो, तिथल्या कारकुनाने ती बघून सांगितले की अमुक कागदपत्रे आणा, आणि (प्रवेश फी सह एका सेमिस्टरची ची फी) २७६ रुपये भरा. मग कॉलेज १ ओगस्ट १९६९ ला सुरु झाले.
मात्र इंजिनियरिंगची फी महिना पंचवीस- तीस रुपये, तर आर्ट स्कूलची अवघा दीड रुपया. सकाळी आर्ट स्कूल, दुपारी इंजिनियरिंग कॉलेज, संध्याकाळी घरच्या होमियोपाथीच्या दुकानात बसणे, पहाटे आणि रात्री निसर्ग भ्रमण. इंदूरच्या जेलरोड वर संध्याकाळी मजनू लोकांची भ्रमंती चालायची, केसांचे कोंबडे काढून, चकचकीत बूट घालून सुंदर मुली बघत हिंडणे, हा उद्योग. तो ही अधून मधून करायचो. या मुलींना समोर बसवून त्यांची पोर्टेट करायला मिळाली, तर किती मजा येईल, असे वाटायचे. तसा प्रयत्न केल्यावर काही केली सुध्धा.
वाचन आणि तेंव्हा आवडलेली चित्रेवाचनाची खूप आवड असल्याने इंदुरातल्या महाराष्ट्र साहित्य सभा आणि जनरल लायब्ररीत नेहमी जायचो, ( १९६९ च्या डायरीतील नोंदी प्रमाणे तेंव्हा वाचलेली पुस्तके- "दृष्टी संरक्षण" "बुद्धीकौशल्य शिक्षक" "व्यायाम ज्ञानकोश" "हसत खेळत मनाची ओळख" "मानसोपचार" "मानसोन्नती" 'आत्मसामर्थ्य योग' )
जनरल लायब्ररीत संदर्भ ग्रंथालय होते, त्यात चित्रकलेवरील पुस्तके कुलूप बंद कपाटात असायची, देव नावाचे कनवाळू गृहस्थ मात्र आपुलकीने कुलुपे उघडून पुस्तके बघू द्यायचे. "चित्र का अल्बम" मध्ये जुन्या मासिकातून प्रसिध्द झालेली चांगली चांगली चित्रे एकत्र केलेली होती. ती मला फार आवडायची, तसेच पाश्चात्य चित्रकलेवरील पुस्तकेही होती. त्यामुळे मला वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी टर्नर, कॉन्सटेबल, काही प्रिराफेलाइट चित्रकार, अल्बर्ट जोसेफ मूर, वगैरे ठाउक झाले. "ब्रोकन पिचर", "अ ब्लाइन्ड गर्ल", "अ समर नाईट" मादाम व्हिजी लेब्रून चे स्वतःच्या मुली बरोबरचे चित्र, वगैरे मला तेंव्हा फार आवडत.
तेंव्हापर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी बघितलेला पहिला खराखुरा चित्रकार म्हणजे पांडू पारनेरकर. खराखुरा यासाठी, कि त्यांच्याकडे तेंव्हा आमच्या स्वप्नातही नसलेले चित्रकलेचे सर्व सामान होते. म्हणजे लाकडी ईझल, पालेट, स्ट्रेचर वर ताणलेला कान्व्हास, ब्रश धुण्यासाठी असणारे विशिष्ट भांडे, लिन्सीड साठी डीपर, लहान मोठे अनेक ब्रश, नाईफ, वगैरे. त्यांना ईझल समोर उभे राहून मान वाकडी करत ऐटीत भराभर ब्रशचे फटकारे मारताना बघून मी दिपून जायचो. शिवाय पर्स्पेक्टीव्ह, प्रपोर्शन, हायलाईट, प्रोफ़ाईल, अकाडेमिक, इम्प्रेशनीस्टिक असे शब्द बोलताना लीलया वापरायचे. मी काढत असलेली चित्रे त्यांना दाखवली कि ते त्यावर मार्मिक भाष्य करीत.
इंदूरचे म्युझियमतेंव्हाच्या इंदूरच्या म्युझियम मध्ये पूर्वी होळकर महाराजांनी परदेशातून आणलेली मोठमोठी सुंदर निसर्गचित्रे होती. त्यातील एका चित्रात संध्याकाळचे धूसर सोनेरी लालसर आकाश, बीजेच्या चंद्राची अस्पष्टशी कोर, मावळत्या सूर्याच्या शेवटल्या सोनेरी उन्हात मधूनच तळपणारे दूरच्या झाडांचे बुंधे, जमिनीवर पसरलेली वाळकी पाने, साचलेल्या पाण्यातील आकाशाचे, झाडांचे प्रतिबिंब असे सर्व काही अश्या कौशल्याने चित्रित केलेले होते, की अगदी मोहित झालो. मग रोज जाऊन मी ते चित्र भारल्यासाराखा बघत बसायचो.
पुढे काय चमत्कार झाला कुणास ठाऊक, म्युझियम मधून ही सर्व चित्रे नाहीशी झाली, अनेक वर्षा नंतर मला ती लंडन च्या प्रसिध्द लिलावात समाविष्ट झालेली दिसली... होळकरांचा प्रसिध्ध्द लालबाग राजवाडा, ज्यात एकेकाळी अनेक अमूल्य कलाकृती असायच्या, आज अगदी उजाड आहे, आणि त्याचे आजचे नाव काय, तर म्हणे नेहरू केंद्र. भारत देश महान हेच खरे...
इंदूर- बडोदा सायकल प्रवासतेंव्हाचे इंदूरचे म्युझियम चे प्रमुख दीक्षित म्हणून होते. (हे अतिशय विद्वान, नम्र, साधेपणाने राहणारे मराठी गृहस्थ होते, ते रिटायर झाल्यावर आलेल्या गर्ग यांच्या काळात चित्रे हलवली गेली) दीक्षितांनी मला बडोद्यातील म्युझियम बघायला सांगितले. १३ जून १९६९ हा दिवस आयुष्यातील अत्यंत भाग्याचा, असे त्या दिवशीच्या डायरीत लिहिले आहे, कारण या दिवशी बडोद्यातील फत्तेसिंह म्युझियम मधील अतिशय सुंदर कलाकृती बघायला मिळाल्या होत्या, पण त्यावेळी एकाच दिवसात घाईघाईने सर्व बघावे लागले होते, त्यामुळे पुढे सुट्टीत एका मित्रासह इंदूरहून बडोद्याला सायकलने गेलो. आठवडाभर तिथली चित्रे व मूर्ती बघण्याचा तो अनुभव अद्वितीय असा होता. पुढे मी अमेरिका, फ्रान्स मधील जगद्विख्यात म्युझियम्स बघितली, तरी त्या वयातील बडोद्यातल्या त्या अनुभवाची गोष्टच निराळी. पाश्चात्य चित्रकारांची ती अद्भुत चित्रे बघून खुळावलो. मग निश्चय झाला की आपण चित्रकाराच बनायचे. इंदूरला परतल्यावर इंजिनियरिंग कॉलेजात जाणे सोडून दिले, पूर्ण वेळ चित्रकलेचा अभ्यास करू लागलो. आई वडिलांनी काही हरकत घेतली नाही. ज्याने त्याने आपापल्या विवेकाने वागावे असे घरातले वातावरण होते. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीची जाणीवही असायची.
आर्टस्कूल चे दिवस१९७० ते १९७५ हा आर्ट स्कूलचा काळ अविस्मरणीय आनंदाचा होता. पैसा जेमतेमच असायचा, पण भरपूर उत्साह, शक्ती होती, आणि आपण आयुष्यात नक्की काहीतरी थोर करणार आहोत, ही काहीशी भाबडी आशा, किंबहुना खात्रीच. आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहेत, ही आशा माणसाला गुंतवून ठेवत असते.
आर्ट स्कूल च्या पहिल्या वर्षी बहुतकरून स्टिललाईफ रंगवायची असत. शिवाय व्हीनस वगैरे पुतळे होते, त्यावरून मनुष्याकृती बनवणे शिकायचे, हुबेहूब रेखाटन करून कागदी स्टंप ने शेडींग करायचे. एक चित्र करायला संपूर्ण एक आठवडा असे.
शिक्षक दिवसातून एखादा चक्कर मारून आमचे काम बघून जात. कधी थोडेसे तोंडी मार्गदर्शन करीत, किंवा आमच्या चित्रांवर करेक्शन देत. त्यावेळी त्यांच्या जराश्या कामातून चित्रात घडून येणारे बदल आश्चर्यकारक वाटत. उदाहरणार्थ स्टिल लाईफ करताना आम्ही चिनीमातीची भांडी, कापड, वगैरे जसेच्या तसे रंगवण्याचा कसोशीने प्रयत्न करायचो, परंतु दुबे सरांनी जेंव्हा भांड्यांच्या खालच्या बाजूच्या फटीतून दिसणारा मागचा प्रकाश ब्रशच्या एकदोन फटकारयातून दाखवला, तेंव्हा चित्र एकदम जिवंत झाले.
... आर्ट स्कूलचा काळ भराभर उलटत होता. पोर्टेट, निसर्गचित्रण, पर्स्पेक्टिव्ह, शरीरशास्त्र, काम्पोझीशन, मूर्तीकला, ग्राफिक प्रिंट, असे विषय होते. सर्व विषयात मला निसर्गचित्रण सर्वात प्रिय. त्यासाठी पहाटे पासून पेस्टल, तैलरंग, जलरंग वगैरेचे सामान, ईझल वगैरे घेऊन दूर दूर सायकलने जायचे, एखादा स्पॉट आवडला कि तिथे बसून चित्रे रंगवायची. सक्सेना सर म्हणायचे कि एकाच साच्यात अडकू नका, वेगवेगळी माध्यमे वापरून काम करा. मग जलरंग, तैलरंग, याबरोबरच आम्ही लाकूड घासण्याच्या रेजमाल वर ओईल पेस्टल ने चित्रे काढणे वगैरे प्रयोग करायचो.
शरीर शास्त्रासाठी व्हिक्टर पेरार्ड याचे पुस्तक फार छान होते. एक भूमितीचे पुस्तक होते, त्यात एका वर्तुळात सत्तावीस वर्तुळे कशी काढावीत, किंवा एका सप्तकोनात बारा अष्टकोण कसे काढावेत, असे अवघड धडे होते, ते मी तासनतास करत बसायचो. पर्स्पेक्टीव्ह हा विषय सर्वांना फार कठीण वाटायचा. बऱ्याच जणांना इंग्रजी जेमतेमच येत असल्याने त्यातील पिक्चर प्लेन, व्हॅनिशिंग पॉईंट वगैरे भानगडी डोक्यावरून जात. मी पुस्तके वाचून हा विषय आत्मसात केला. एके दिवशी रात्रीच्या सुमारास आमचा एक धनाढ्य सिनियर घरी आला, त्याला दुसऱ्या दिवशी पर्स्पेक्टिव्ह च्या दहा आकृत्या परिक्षेसाठी सबमिट करायच्या होत्या, त्याने मला बरेचसे पैसे देऊ केले. ते काम मी त्याला करून द्यावे यासाठी. ते मला अगदी सहज करता आले असते, परंतु त्याकाळी काय किंवा नंतर काय, अश्या बाबतीत माझे विचार अगदी अव्यवहारी. मी त्यालाच भाषण दिले कि ज्याचे काम त्यानेच करायला हवे वगैरे. कलेचा उपयोग पैका कमावण्यासाठी करायचा, हे माझ्या त्यावेळच्या तत्वात बसणारे नव्हते. त्याकाळी निदान इंदुरात तरी चित्रे विकली जाणे वगैरे ऐकीवातही नव्हते. यातून पैसा मिळू शकतो वा मिळावा, हे काही मनात नसायचे. आम्ही आपले झपाटल्यासारखे चित्र रंगवत असायचो.
खरेतर त्याकाळी आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. तिसर्या वर्षाच्या सुरुवातीला किरकिरे सरांनी तैलरंगाचे सर्व सामान, हॉग हेयर ब्रश वगैरे आणायला सांगितले. (हॉग म्हणजे काय, हे घरी जाऊन शब्दकोशात बघितले, तर 'अंड बडवलेला डुक्कर' असा अर्थ दिलेला होता) हे ब्रश, रंग महाग होते, मोठी पंचाईत झाली. मग स्वस्ताचे पावडर कलर, बेल तेल आणून खलबत्त्यात घोटून तैलरंग बनवले, आणि गायीच्या शेपटीचे केस कापून ब्रश बनवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी हे सामान वापरून पोर्ट्रेट करू लागलो, ते बघून किरकिरे सरांनी विचारले कि घरून पैसे मिळत नाहीत का वगैरे...
सक्सेना सरदुसऱ्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'कान्पोझीशान' साठी प्रो. चंद्रेश सक्सेना यांच्या आठवडाभराच्या वर्गाला जायचे होते. त्यांच्याविषयी असलेला आदरयुक्त दबदबा ऐकून होतो. इतर वर्गांप्रमाणे त्यांच्या वर्गात अजागळपणे पसरलेले लाकडी 'डोंकी' नव्हते. खाली मोठी सतरंजी व त्यावर सुमारे एक फूट उंचीचे प्रशस्त टेबल होते. भिंतींवर बेंद्रे, डीजे जोशी यांची चित्रे व्यवस्थित टांगलेली, लाकडी कपाटात निवडक पुस्तके, सगळीकडे कमालीची स्वच्छता.
सक्सेना सर मुंबईला जे जे मध्ये, नंतर शांतीनिकेतन ला नंदलाल बसूंकडे शिकून आलेले होते. सर अतिशय व्यवस्थित व शिस्तप्रिय. चित्रकारांची राहणी, त्यांचे रंगसामान वगैरे अगदी टीपटाप असले पाहिजे, ब्रशचे पितळी फेरूल नेहमी चकाकत असले पाहिजे, ब्रश चकचकीत पितळी नळकान्ड्यात ठेवायचे, रोज सर्व ब्रश साबणाने धुवून मगच घरी जायचे, पालेट वर ठराविक क्रमाने रंग काढायचे, एप्रन घालून काम करायचे, वगैरे आदर्श स्वतःच्या उदाहरणातून आमच्या समोर मांडायचे.
तर त्या पहिल्या दिवशी त्यांनी जे भाषण दिले, त्याने माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली. (उदाहरणार्थ, 'स्त्रियांकडे बघू नये' अशी साधुसंतांची शिकवण ऐकत आलेलो होतो, तर सरांनी सांगितले, की घरी काय बसता, घाटावर जा, तिथे आंघोळ करत असलेल्यांची स्त्रियांची स्केचेस करा, वगैरे... किंवा चित्रकलेचे शिक्षण तुम्ही उपजीविकेसाठी म्हणून घेऊ नका, तर या अभ्यासातून लाभणार्या सौदर्यदृष्टीचा उपयोग आयुष्यात प्रत्येक क्षणी करा. तुमचा भवताल, वस्तू, तुमचे अवघे जीवन सुंदर करा....) चित्रकाराने कसे राहावे, काय करावे, चित्रकलेचे महत्व, असे सर्व काही त्या भाषणात होते. आम्ही सर्व विद्यार्ही अगदी भारून गेलो. माझी मरगळ, निरुत्साह, संकोच, सर्व काही जणु जळून गेले, आणि उत्साहाने, चैतन्याने मी कामाला लागलो. आज चाळीस वर्षानंतर सुध्धा मी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो...
पुढे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आर्ट स्कूलला गेलो होतो, पाहतो तर काय, सर शाळेच्या एकूण एक फर्निचरला स्वतः हाताने polish करत बसले होते. म्हणाले, आता शाळा सुरु झाल्यावर मुले येतील, तेंव्हा त्यांना सर्व काही व्यवस्थित, नीटनेटके दिसायला हवे ... आर्टस्कूल संपूर्णपणे सरकारी होते, त्यामुळे अश्या कामासाठे पैसा मंजूर करवणे वगैरे फार त्रासाचे असे, त्यामुळे सर हे सर्व स्वखर्चाने, स्वतःच्या मेहनतीने करत होते... मी खूपच भारावून गेलो... आम्हाला स्टिललाईफ मध्ये फळांची चित्रे काढण्यासाठी ते स्वखर्चाने अगदी रसरशीत महागडी फळे आणत... नोकरी म्हणून नव्हे, तर एक पवित्र कार्य म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना ते घडवत होते...
पहिली नोकरी १९७२ साली इंदूर पासून पाच मैलांवर असलेल्या कस्तुराबाग्रामला मला दीडशे रुपये महिन्याची अर्धवेळ नोकरी मिळाली, आणि चणचण संपली. कस्तुराबाग्रामला सर्व स्त्रीराज्य. शिक्षकांपैकी फक्त मी आणि संगीत शिक्षक प्रभाकर अजबे हे पुरुष. परिसर मात्र अतिशय रम्य. सर्वत्र झाडं, कौलारू घरं, कच्चे रस्ते, असा. मी तिथे खूप रमायचो. कुठेही बसून निसर्गचित्र काढावीत. मला अगदी लहानपणापासून परिचित आणि प्रिय असलेला रालामंडळ चा डोंगरही जवळच होता. लहानसं, मातीची घरं असलेलं गाव, ओढा, त्यावर पूल, चिंचेची मोठमोठी झाडं, असा सगळा मला आवडणारा मालमसाला तिथे होता.
चिंचाळकर गुरुजी इंदुरातील त्याकाळच्या चित्रकारांपैकी 'गुरुजी' म्हणजे विष्णु चिंचाळकर हे सर्वात जास्त प्रसिध्द होते. ते अतिशय उत्कृष्ट चित्रकार तर होतेच, पण विशेष म्हणजे त्यांचेकडे सर्वाना मुक्तद्वार असायचे. कुणीही केंव्हाही गेले, तरी ते आपुलकीने बोलत, तासन तास गप्पा करत. त्याकाळी ते प्रत्यक्ष पेंटिंगपेक्षा, निसर्गात सापडणार्‍या वा मानव निर्मित लहान-सहान वस्तूंतील सौदर्य उकलून दाखवणार्‍या अतिशय सुंदर रचना करत. त्याना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांची ती निर्मिती बघून आणि त्यावर चालणारे त्यांचे भाष्य ऐकून अगदी भारून जात असे, आणि जगाकडे बघण्याचा एक अगदी नवीन, आनंददायक असा दृष्टीकोन घेऊन परत जात असे. गुरुजींच्या कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप त्यांच्या त्या लहान-लहान रचनांमधून दिसून येत असली, तरी मला आपले वाटत रहायचे, की त्यांनी मोठमोठी तैलचित्रे रंगवावीत... पण का कुणास ठाऊक, असे काम त्यांनी फारसे कधी केले नाही. तशी त्यांनी कस्तुराबाग्रामला "स्त्रीशक्ती" या विषयावर चित्रांची एक मालिका केली होती, ती चित्रे पण फार सशक्त आणि सुंदर होती. त्या काळच्या इंदुरातल्या धनाढ्य लोकांची व्यक्तिचित्रे करण्याचे काम पण ते अधून मधून आपल्या विशिष्ट शैलीत करत असत. गुरुजी एवढे मोठे, प्रसिध्द चित्रकार, पण त्यांची राहणी अगदी साधी, वागणूक विनम्र आणि प्रेमळ.
मांडवचा किल्ला आणि विश्वनाथ शर्माजी 
आमचे सक्सेना सर त्यांच्या तरुणपणी सहा महिने मांडूगडावर (मांडवचा किल्ला) जाउन राहिले होते, त्यांची त्याकाळची तिथली अद्भुत निसर्गचित्रे आजही मला आठवतात. ती बघून आम्ही तीन मित्रांनी मांडवला जायचे ठरवले. छप्पन मैलांचा प्रवास सायकलने सहज पार पडला. वाटेत खेडूत वा आदिवासींचे घोळके दिसले, की थांबून स्केचेस करायचो (सुमारे १९७० साली)
रात्रीच्या सुमारास मांडव ला पोचल्यावर तिथल्या राम मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो.... रात्री भयंकर थंडी पडली, आम्ही पांघरुणे वगैरे काहीच आणली नव्हती... पण सकाळी जाग येते तो काय, आमच्या अंगावर दुलया, आणि जवळच एक तरुण आमच्या उठण्याची वाट बघत सुहास्य वदनाने बसलेला... लगेच गरमागरम चहा आणून त्याने आस्थेने आमची विचारपूस केली. त्याचे नाव कैलाश शर्मा. मंदिराच्या आवारातच वृध्द आईसोबत रहायचा. त्याने आमचे सामान बघून आम्ही चित्रकार असल्याचे ओळखले होते ...
त्याचेशी गप्पा झाल्यावर कळले, की तो पूर्वी आठवीत नापास झाल्याने वडील मारतील या भीतीने घरून पळून मुंबईला गेला होता. योगायोगाने त्याला प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचे घरी नोकर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मुंबईतील चित्रकार व चित्रकलेबद्दल त्याला माहिती झालेली होती. आमच्या त्या मुक्कामात त्याने आमची खूप सरबराई केली.
नंतरची काही वर्षे मी मांडव ला आलो की त्याला भेटायचो, वडील वारल्यामुळे त्याला तिथे रहाणे भाग पडले होते, पण आता त्याचे चित्त तिथे रमत नव्हते, तो नेहमी उदास मुद्रेने 'ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही' हे गाणे म्हणत असायचा. पुढे त्याला दारूचे व्यसन लागले आणि शेवटी त्याचा मृतदेह जंगलातल्या खोल दरीत सापडला... हे ऐकून मी खूप विषण्ण झालो होतो. एक उमदा जीव असा भरकटत गेला...आपण त्याच्यासाठी काहीच करू शकलो नाही, ही हळहळ पण दाटली...
मांडव मधील सर्वात थोर व्यक्ती म्हणजे वयोवृद्ध विश्वनाथ शर्माजी. त्यावेळी काहीतरी ऐंशी नव्वद वयाचे असावेत. त्यांचे अतिशय सुंदर कौलारू घर तिथे होते, पाठ पूर्णपणे वाकून गोल झालेल्या पत्नीसह ते तिथे रहात. ते तिला "ब्राम्हणी" म्हणत. ब्राम्हणीला उभे राहता येत नसे, जमिनीवर रखडत रखडत इकडे तिकडे सरकायचे. अश्या अवस्थेतही ती स्वयंपाकपाणी वगैरे सर्व करायची, आमचा मुक्काम त्यांच्या घरीच असायचा. त्यांच्याकडे शेंगा, बोरे, कवठे असा रानमेवा भरलेला असायचा, आम्हाला आग्रह करकरून घ्यायला लावायचे.
वृध्द शर्माजी त्यांच्या अनेकानेक आठवणी अगदी रसाळ भाषेत रंगवून रंगवून सांगायचे... अतिशय गोड, लाघवी बोलणे असलेली व्यक्ती, असा पुलंनी त्यांचा उल्लेख केलेला वाचनात आलेला आहे... संस्कृतचे ते पंडित होतेच, इतिहासाचा गाढा व्यासंग, पेशाने सिव्हील इंजिनियर, विनोदप्रिय, रसिक स्वभाव, असे बहुरंगी व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. पंडित नेहरू, परदेशातील महत्वाचे सरकारी पाहुणे, अशी थोर मंडळी मांडव बघायला आली, की त्यांना मांडवगड दाखवण्यासाठी शर्माजीच असायचे. 'लोहानी गुफा' ही खडकात खोदलेली लेणी त्यांनीच शोधली होती. एकदा दरीच्या टोकावर धबधब्या जवळ बसलेले असताना अचानक खालच्या खडकाखालून एक वाघ निघून दरीत उतरून गेला. वाघाची गुहा शोधून काढताना लेणी सापडली.
त्यांनी सांगितलेली एक आठवण अशी: " फ्रेंच अँबेसॅडर आया था... होशंगशाह का मकबरा देखकर बोला, ब्यूटिफुल... मैने पूछा, आपके देशमे सौंदर्य की व्याख्या क्या है ? उसने कहां, " everything in prportion is beauty " फिर उसने पूछां, आपके देशमे सौंदर्य की व्याख्या क्या है ? मैने कहां, एक घंटे बाद बताऊंगा... उसे आश्चर्य हुवा... एक घंटे बाद घूम फिर कर वो वापस जाने निकाला, तब मैने कहा, चलो होशंगशाह का मकबरा एक बार फिर देखते है... उसने कहा, वो तो देख लिया, अब फिर क्या देखना है ? मैने कहा, " सौंदर्यपूर्ण वस्तुओंकी फेरहिस्त से होशंगशाह के मकबरे का नाम निकाल दो... उसने पूछां क्यो? फिर मैने संस्कृत मे सौंदर्य की व्याख्या सुनाई: " क्षणेक्षणेयन्नवतामुपयती तदेवरूपं रमणीयताय: " अर्थात बार बार देखने, सुनने पर भी जो प्रतिपल नवीनता की अनुभूती दे, वही सौदर्य है... खुष हुवा, व्याख्या लिख कर ले गया... उसने बोला, मिस्टर शर्मा, आपके लिये अपने देश से क्या भेजू? मैने कहा, मुझे कुछ नही चाहिये, लेकीन यहांके गरीब आदिवासी जंगल मे रहते है, थंड मे बडी मुश्किल होती है, उनके लिये अगर कुछ कर सको तो करो... फिर कुछ दिन बाद ट्रक भर कर कंबल आये... बाट दिये "
मांडव गडाचे एका ब्रिटिश कलावंताने काढलेले चित्र त्यांच्या बघण्यात आले, तेंव्हा त्यांनी त्यातील चूक अशी काढली, की चित्रातील गाय ही इंग्लिश आहे... (बहुधा ते चित्र हे असावे).
... असे होते शर्माजी. लग्नानंतर मी सर्वात आधी पत्नीसह त्यांच्या पाया पडायला मांडवला गेलो होतो...
तर अश्या या मांडवला अनेकदा गेलो, चित्रे काढली. तिथले ते सर्वत्र माजलेले रान आणि त्यात पसरलेले भग्नावशेष, आकाशातील ढग आणि उन्ह-सावलीचे खेळ, दूरवर पसरलेल्या दर्या-खोर्‍यांवर पसरणारे धुक्याचे अद्भुत आवरण, सर्व काही अगदी भारून टाकणारे असायचे. मी या जागेच्या इतक्या प्रेमात पडलो, की आपण यापुढे इथेच राहावे, असे वाटू लागले. शर्माजी म्हणाले की तिथे शंभर रुपयात प्लॉट मिळत होता, तो घेउन तिथे मातीचे सुंदर कौलारू घर व स्टुडियो बनवावे, असे फार वाटू लागले...पण उपजीविकेची सोय काय करायची ? मांडव गाव अगदीच लहान, एकवेळ मी न्हावगंड असतो (त्याकाळी बहुतेक लोक न्हाव्याला 'न्हावगंड' म्हणत) तरी हजामती करून पोटापुरते मिळविता आले असते, पुढे सलून वगैरे थाटून गावातील प्रतिष्ठित वगैरेही होता आले असते, पण चित्रकार ? ... काहीतरीच काय ?
... मग कैलाश शर्मा म्हणाला की आपण तुझी इथली निसर्गचित्रे इथल्या एम्पोरियममध्ये ठेऊया, ती तिथून विकली जातील. चित्रकलेशिवाय मला काही करायचेही नव्हते आणि येतही नव्हते, त्यामुळे ही कल्पना मला आवडली. मग मांडवची खूपशी चित्रं काढून एम्पोरियममध्ये ठेवली आणि इंदूर ला येउन मांडवला स्टूडियो बांधून राहण्याच्या स्वप्नात मग्न झालो....
त्या काळी भारतात दूरदर्शन अगदी प्रारंभिक अवस्थेत होते. ओरिसात कटकला नवीन दूरदर्शन केंद्र उघडत होते. तिथे चित्रकार म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे पत्र आले. मी कटकला गेलो देखील, पण मांडव ला रहाण्याच्या कल्पनेने इतका भारून गेलेलो होतो, की एवढी चांगली संधी सोडून नोकरीवर रुजू न होताच परतलो. परंतु मांडव माझ्या नशिबात नव्हते, असेच म्हटले पाहिजे, कारण पुढील २-३ वर्षात तिथून एकही चित्र विकले गेले नाही, मग कसला स्टुडिओ अन कसले काय... अश्या प्रकारचा अव्यवहारीपणा माझ्याकडून अनेकदा घडला, अजूनही घडतो ... पण असे असूनही कधी कोणत्या गोष्टीचा पश्चाताप वाटला नाही..
पुढील बेत व प्रयत्न मी, हरेंद्र शाह, रमेश खेर, शंकर शिंदे आणि योगेंद्र सेठी असा आमचा पाच जणांचा ग्रुप बनला होता. आम्ही निसर्ग चित्रणासाठी जायचो, कधी कुणीतरी मॉडेल गाठून पोर्टेट करायचो, प्रदर्शनाचे बेत करायचो. रविवारी आम्ही सर्वजण इंदुरातल्या एखाद्या मोठ्या चित्रकारांकडे जायचो. त्यापैकी बहुधा सर्व सांगायचे, कि तुम्हाला इंदूर सोडून मुंबई, दिल्ली अश्या मोठ्या शहरात गेले पाहिजे, तरच तुम्हाला मोठे होता येईल... इंदुरात राहून आपला कलावंत म्हणून विकास होऊ शकला नाही, बेंद्रे - हुसेन बाहेर पडून मोठे झाले, असे त्याना वाटत असायचे.
मी मुंबईला जाऊन रहाण्याचा निश्चय करून तिथे गेलो. ठाण्याला मोठा भाऊ रहात होता. तशी मुंबईतील गर्दी, उकाडा, गजबज, हे काहीच आवडले नाही, त्यातून तिथे आजारी पडलो. एका मराठी डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सर्व चवकशी केली, म्हणाले, कोणत्या मूर्खाने सांगितले तुम्हाला इथे येऊन रहायला? आपल्या गावी परत जा, तिथेच तुमची तब्येत ठीक राहील. त्यावेळी परत आलो, पण डोक्यात तो मोठे बनण्याचा किडा वळवळत होताच, पुढे पुन्हा दोन-तीनदा मुंबईसाठी प्रयत्न केला, पण काही ना काही कारणाने ते जमले नाही...
(पुढील आठवणी पुन्हा कधीतरी.....)

No comments:

Post a Comment