‘रोम’ रंगी रंगले मन -
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.
रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे.
टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.
याआधीचा भाग: आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १)
http://misalpav.com/node/51037
वरील लेखातील घटनाक्रमानंतर पॅरिसला आल्यावर आता पहिला प्रवास कुठला करावा याचा विचार करता पहिले नाव सुचले, ते म्हणजे रोम. यापूर्वी तिथे दोनदा जाऊन आलेलो असलो तरी समाधान झालेले नव्हते.
लहानपणी चांदोबात वाचलेल्या ग्रीक-रोमन कथा, पुढे इंदूरच्या कलाशाळेत आणि बडोदा, मुंबई वगैरेंच्या संग्रहालयांमध्ये असलेल्या ग्रीको-रोमन संगमवरी मूर्ती, त्याकाळी गाजलेले टेन कमांडमेंट्स (१९५६) बेनहर (१९५९) फॉल ऑफ रोमन द एम्पायर (१९६४) इत्यादि चित्रपट या सर्वातून रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते. पुढे यूट्यूबवर आणखी बरेच काही बघितल्यावर तर आपण केंव्हा एकदाचे रोमला जातो असे झाले होते.
ग्रीक पुराणकथेवरील चांदोबातील चित्र.
मग २०१५ मध्ये पहिल्यांदा सहकुटुंब रोमवारी घडली. (यावर लिहिलेला लेख इथे आहे)
https://www.misalpav.com/node/37453
नंतर २०१८ मध्ये एकट्याने पाच दिवस आणि आता पुन्हा २०२२ मध्ये एकदा एकट्याने दहा दिवस रोममध्ये भटकून आलो. रोमच्या पहिल्या २०१५ मधील प्रवासाच्या वेळी वय ६४ होते, तर आता बहात्तराव्या वर्षी दररोज सहा-सात तास पायी फिरणे कठीण जाऊ लागले. तरी आता फिरून घेतले नाही तर पुढे ते आणखी आणखी कठीण होत जाणार या विचाराने हा बेत यशस्वीपणे पार पाडला.
Airbnb द्वारे एक खोली दहा दिवसांसाठी आरक्षित केली (सुमारे २५०० रुपये रोज) जवळच असलेल्या बस- स्थानकावरून बस पकडून पुढे मेट्रो गाठून कुठेही जाता यायचे. सकाळी खोलीवर चहा/ कॉफी करून घ्यायचो, आणि एक मोठा वाडगाभर फळे - दही खाऊन फिरायला निघायचो. दुपारी पिझाचा एक लहानसा तुकडा, आणि संध्याकाळी खोलीवर खिचडी बनवून खाणे पुरेसे व्हायचे. रोममध्ये कॉफी आणि ताजा संत्र्याचा रस चांगला मिळतो, तेही घ्यायचो.
सकाळचा नाश्ता.
Tivoli - तिवोली
मिपाकर चौकटराजा यांनी रोमपासून ३० किमी अंतरावरील Tivoli - तिवोली अवश्य बघायला सांगितले होते (खरेतर आम्ही दोघे तिथे कधीतरी एकत्र जाऊ, असा आमचा बेत ठरला होता, पण चौरांच्या आकस्मिक जाण्याने ते शक्य झाले नाही )
खूप वर्षांपूर्वी या जागेची सर्वप्रथम ओळख मला सतराव्या शतकातील एका चित्रावरून झालेली होती.
तिवोली चे दृश्य - चित्रकार: Claude Lorrain (इ.स. १६४४)
या चित्रात दिसणारी इमारत ( Tempio di Vesta) इ.पू. पहिल्या शतकातले मंदिर आहे. या मंदिरात तेवणारी अखंड ज्योती टिकवून ठेवण्याची जबाबदारी इथल्या सेविकांची (Vestal virgins) असे. या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे. ही ज्योत जोवर टिकून आहे, तोवरच रोमन साम्राज्य टिकून राहील, अशी श्रद्धा असल्याने ती कसोशीने अखंड टिकवून ठेवली जायची.
Vestal virgins संगमरवरी मूर्ती.
'तिवोली' जागेचे प्राचीन नाव Tibur असे असून तिथे इ.पू. तेराव्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इ.पू. ९० साली हा प्रांत रोमन साम्राज्याचा भाग झाल्यावर तिथे प्राख्यात कवी होरेशियस (अथवा ‘होरेस’ इ.स. पूर्व ६५-८), सम्राट ऑगस्टस, पालमिराची राणी झेनोबिया अशा अनेक धनिकांनी आपापले प्रासाद बनवले. त्यापैकी दोन बघितले.
( रोमच्या Ponte Mammolo या (Line A Metro) स्टेशनच्या बाहेर Catral कंपनीच्या निळ्या रंगाच्या सुंदर बसेस दिवसभर तिवोलीला जा-ये करत असतात. जाण्या-येण्याचे बसभाडे साडेचार युरो आहे. दोन्ही जागी भरपूर चालावे, चढावे-उतरावे लागते. बॅटरी-चालित रथ उपलब्ध नाहीत).
Villa Adriana (Hadrian's Villa) - तिवोलीतील सर्वात भव्य प्रासाद
सम्राट आद्रिआनो Adriano ( इंग्रजी उच्चार- ‘हॅड्रियन’ इ.स. 76 -138 ) याने इ. स. 117 ते 138 या काळात, अडीचशे एकराच्या जागेत विस्तृत उद्यान आणि अनेक इमारती उभारल्या होत्या. यापैकी थोड्याश्या जागेतच उत्खनन झालेले असूनही अचंबित करणाऱ्या सुमारे तीस भव्य वास्तू इथे बघायला मिळतात. हा परिसर एक आदर्श वसाहत म्हणून निर्मित केला गेला होता आणि त्यात प्राचीन ग्रीस, रोम आणि इजिप्तच्या स्थापत्य - परंपरांचा समावेश केला गेला होता. हा रोमन साम्राज्यातील सर्वात मोठा आणि सर्वात भव्य शाही व्हिला होता.. इथे राजवाडे, लायब्ररी, अतिथी निवासस्थान, सार्वजनिक स्नानगृहे आणि दोन थिएटर होते.
हे स्थान तिथल्या मुबलक पाण्यामुळे आणि रोमकडे जाणाऱ्या चार जलवाहिनींच्या (Aqueducts: Anio Vetus, Anio Nobus, Aqua Marcia, and Aqua Claudia) उपलब्धतेमुळे निवडले गेले होते.
हल्ली व्हिला' हा शब्द आपल्याकडे एकाद्या लहानशा बंगल्यासाठीही वापरला जात असला, तरी रोमन काळातील व्हिलाचा अर्थ म्हणजे शहराबाहेरील निसर्गरम्य, विस्तृत जागेत आलिशान प्रासाद, विस्तीर्ण उद्याने, कारंजे, मूर्ती, भित्तीचित्रे, स्नानगृहे, तलाव, तसेच ग्रंथालय, अतिथीनिवास वगैरे अनेक इमारती असलेली जागा.
‘आद्रिआनो’ हे सम्राटाचे (पुल्लिंगी) नाव असूनही व्हिला ‘आद्रिआना’ (स्त्रीलिंगी) असे का म्हटले जाते, याचे कारण ‘व्हिला’ शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून, असे समजले.
आद्रिआनोच्या मृत्यूनंतर (त्याच्या आयुष्याच्या शेवटल्या दहा वर्षात हा व्हिला बांधला गेला असल्याने त्यामुळे त्याला त्याचा उपभोग घेता आला नसावा, याचे मला वैषम्य वाटते) त्याचे विविध उत्तराधिकारी - अंतोनियस पायस, मार्कस ऑरेलियस, ल्युशियस वेरस, कॅराकेला तसेच पाल्मिरा (-सिरिया) ची राणी झेनोबिया वगैरेंनी इथे वास्तव्य केले. इ.स. चौथ्या शतकातील रोमन साम्राज्याच्या उतरत्या काळात ही जागा वापरात न राहिल्याने तिथल्या अनमोल मूर्ती आणि संगमरवरी दगड, स्तंभ इत्यादी लुटले जाऊन पुढे अनेक इमारती (उदाहरणार्थ: Villa D ’Este) बांधण्याच्या कामास घेतले गेले.
रोमपासून तासाभराचा बसप्रवास केल्यावर मुख्य रस्त्यापासून सुमारे २ किमी अंतर पायी जाऊन मी या व्हिलाच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता शिरलो. सर्वत्र प्राचीन भव्य इमारतींचे अवशेष बघता बघता संध्याकाळ झाली.
आद्रिआनोचा मुख्य प्रासाद
प्रसादाजवळील पुष्करिणी
झाडीत लपलेले एक सुंदर घर.
संध्याकाळी पाच पर्यंत अखंड पायी फिरून इथल्या जास्तीत जास्त इमारती बघण्याचा प्रयत्न केला. शेवटी आकाश भरून येऊन जोराचा पाऊस सुरु झाला आणि सगळीकडे पाणी साठले.
व्हिला बंद होण्याची वेळ होत आलेली होती, तरी शेवटले 'अपोलोचे मंदिर' बघायचेच असा निश्चय करून भर पावसात भिजत, धावत टेकडी चढून ती जागा गाठली खरी, पण तिथे मंदिराचा जेमतेम पायाच काय तो होता. मग धावत परत येऊन तिथल्या लहानश्या संग्रहालयात आश्रय घेतला.
संग्रहालयातले फोटो:
व्हिला आंद्रियानाच्या अद्भुतरम्य वातावरणाचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन खोलीवर येऊन दुसरे दिवशी दुसरा प्रसिद्ध व्हिला Villa d’Este गाठला. (या दोन्ही जागा UNESCO World Heritage Sites आहेत)
सोळाव्या शतकात Cardinal Ippolito II d'Este (इ.स. १५०९-७२) याने 'व्हिला आद्रियाना'तील दगड- मूर्ती वापरून स्वतः:चा Villa d’Este हा विशाल प्रासाद आणि उद्यान बनवले. (मशारनिल्हे कार्डिनल हा ‘ल्युक्रेशिया बोर्जिया’ चा मुलगा असल्याचे समजल्यावर मला भारीच उत्सुकता निर्माण होण्याचे कारण म्हणजे The Borgias (2011) ही अप्रतिम टीव्ही सिरीज.
व्हिलाच्या गच्चीवरून दिसणारे तिवोली गावाचे दृश्य.
Villa d'Este हा पुनर्जागरण-काळातील (Renaissance period) उद्यान आणि वास्तुरचनेचा एक मानबिंदू असून या ठिकाणी नैसर्गिक उताराचा उपयोग करून घेत सुमारे शंभर कारंजे बनवलेले आहेत. याची निर्मिती १५५०-७० या काळात Pirro Logorio या वास्तुरचनाकाराने केली.
कारंज्यातून उसळणारे पाणी Aniō नदीचे असून ते ६०० मीटर लांबीच्या भुयारातून आणले गेलेले आहे. hydraulic engineering चे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. रोमला पाणीपुरवठा करणारे मुख्य तीन Aquaduct हे Aniō नदीचेच पाणी प्राचीन काळी आणत असत.
या परिसरात जिकडे तिकडे वाहते पाणी,धबधबे, कारंजी, तलाव, गच्च झाडीत लपलेले पुतळे, डोंगरउतारावरील रुंद पायऱ्यांचे मोठमोठे जिने, विविध वास्तु वगैरे बघत हिंडताना संध्याकाळ केंव्हा झाली, कळलेही नाही.
याबद्दलचा विडिओ:
https://www.youtube.com/watch?v=zGdjf9wzHOI
रोमचा 'किल्ला' : 'कास्तेल सांतान्जेलो Castel Sant'Angelo
हा किल्ला म्हणजे मुळात रोमन सम्राट आद्रियानोची समाधी होती. ही वास्तु इ.स. 135-139 या काळात वास्तुविशारद डेक्रिनसच्या मार्गदर्शनाखाली बांधली गेली आणि 5 व्या शतकात तिचे किल्ल्यामध्ये रूपांतर करून समाधीच्या प्राचीन अवशेषांवर एक भव्य वाडा बांधला गेला. हा वाडा सहा माजली असून त्यात ५८ दालने आहेत.
किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी नदीवर बांधलेल्या पुलावर असलेल्या दहा मूर्तींची रचना 1668 साली बर्निनी यांनी केली होती. काही काळ पोपचे निवासस्थान, नंतर तुरुंग, बॅरेक्स आणि युद्धसाहित्याचे गोदाम म्हणून कामात आल्यावर ६ वर्षांच्या जीर्णोद्धार मोहिमेनंतर, १९०१ साली संग्रहालय म्हणून लोकांसाठी खुले केला गेला.
कास्तेल सांतान्जेलो Castel Sant'Angelo : रोमचा किल्ला
किल्ल्यावरून दिसणारे नदीचे दृश्य.
किल्ल्यातील वरपर्यंत जाणारा वळणदार रस्ता.
किल्ल्याची प्रदक्षिणा
किल्ल्यातील जिना.
रोम मधे निवांत फिरताना टिपलेली काही दृश्ये:
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
मातीच्या विटांच्या भिंती बांधण्याची प्राचीन पद्धत.
रोममधील शेकडो गल्ल्यांपैकी एक
Villa D ’Este बद्दलचा व्हिडियो:
https://www.youtube.com/watch?v=a0f_BXwHzGQ