Sunday, August 23, 2020

Saturday, August 15, 2020

नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती

नयन वळविता सहज कुठेतरी - काही चित्रस्मृती .
सहज कुठेतरी फिरत असता अचानक काहीतरी दृष्टोत्पत्तीस येऊन क्षणभर आपण खिळून जावे, कुठल्यातरी संग्रहालयात पायपीट करताना एकाद्या कलाकृतीने आपले चित्त वेधून घ्यावे, किंवा कधीतरी कुठेतरी कोणीतरी आपले मन मोहून टाकावे ... अशावेळी क्लिकलेली काही स्मृतिचित्रे ...
चित्र 1 फिलाडेल्फिया कलासंग्रहालयातील एक प्राचीन मंडप.
1912 साली आदेलीन गिब्सन Adeline Pepper Gibson (1883 - 1919) ही तरुणी मधुचंद्रासाठी भारतात गेलेली असताना तिला मदुराईमधील एका मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांपासून पडून असलेले ग्रॅनाईटचे मोठाले स्तंभ दिसले. तिने ते ६० स्तंभ खरेदी करून अमेरिकेत आणले. पहिल्या महायुद्धयात ही तरुणी फ्रान्समध्ये नर्स म्हणून काम करत असता मृत्युमुखी पडली. 1920 साली प्रख्यात कला- मर्मज्ञ आनंद कुमारस्वामी यांनी फिलाडेल्फिया म्युझियम मधे हा मंडप उभा केला.... सगळेच अतर्क्य आणि अद्भुत.

चित्र 2  ख्रिस्ती भिक्षुंच्या प्राचीन मठातील (Cloister) चौक

इ. स. 1270-80 या काळात फ्रान्स मधे बांधलेल्या एका ख्रिस्ती मठाचा हा भाग 1928 पासून फिलाडेल्फिया कलासंग्रहालयात आहे. (जगभरातील विविध ठिकाणच्या प्राचीन, मोडकळीस आलेल्या वास्तू खरेदी करून अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये त्या पुन्हा उभारून आपापली शहरे समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या तात्कालीन अमेरिकन नागरिकांचे कौतुक वाटते )
चित्र 3-5. चित्रकार N. C. Wyeth (1882 –  1945)  यांचा स्टुडियो.






फिलाडेल्फियामधे N. C. Wyeth यांनी 1911 मधे अठरा एकर जमीन घेऊन बनवलेले घर आणि स्टूडियो तसेच त्यांची अनेक चित्रे बघायला मिळाली. त्यांची ३००० हून अधिक चित्रे आणि त्यांनी चित्रित केलेली ११२ पुस्तके आजमितीला उपलब्ध आहेत. 1945 साली मृत्यूच्या आदल्या दिवशी अपूर्ण राहिलेले चित्र अजूनही ईझलवरच आहे (वरील फोटोत उजवीकडे)
याच परिसरात 'ब्रॅंडिवाईन' नदीच्या काठी असलेल्या संग्रहालयात वाईथ यांची पुष्कळ चित्रे आहेत.
या संग्रहालयाचे आणखी एक महत्वाचे कार्य म्हणजे या परिसरातील 63000 (त्रेसष्ठ हजार) एकर जमीनीचे आणि पाण्याचे संरक्षण, संवर्धन नियोजन. त्यामुळे या भागाचे कधीही औद्योगिकीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे.
याविषयी माहिती:https://www.brandywine.org/


चित्र 6.   Villa at Caprarola चित्रकार: Claude-Joseph Vernet (1714 - 1789) या चित्रासोबत अस्मादिक.
या चित्रात इटलीतील प्रसिद्ध 'फारनेजे' (Farnese) घराण्यात जन्मलेली स्पेनची राणी एलिझाबेथ, आपल्या इटलीतील पूर्वजांचा किल्ला बघण्यासाठी आलेली असतानाचे दृश्य रंगवलेले आहे.
हे फारनेजे घराणे अजून रोममधे त्यांच्या भव्य प्रासादात निवास करत असून तो Raphael (1483–1520) या चित्रकाराने केलेल्या प्रचंड भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी हा प्रासाद बघितलेला असल्याने मला या चित्राबद्दल कुतूहल निर्माण होऊन ते जास्त बारकाईने बघितले.
चित्र 7-11. या चित्रातले काही तपशील:







नेपोलियनच्या पराभवानंतर त्याचा अमेरिकेला जाण्याचा बेत फसला परंतु त्याचा भाऊ जोसेफ (नेपोलियनने जिंकलेल्या तात्कालीन स्पेनचा तात्पुरता राजा) अमेरिकेला जाऊ शकला. त्याने हे चित्र स्पेनहून अमेरिकेत आणले.
राणीच्या या सफरीत चित्रकार मुद्दाम चित्र बनवण्यासाठी सामील झालेला होता. (त्याने स्वतःचे चित्र पण डावीकडल्या सावलीच्या भागात रंगवले आहे) हे चित्र बघितल्यापासून हा किल्ला बघण्याची उत्सुकता जागृत झालेली आहे. विशेषतः हे चित्र कुठे बसून काढले असावे, ते हुडकता आले तर खूपच समाधान लाभेल. बघूया केंव्हा योग येतो.
चित्र 12. चित्रातल्या इमारतींचे विहंगम दृश्य. (जालावरून साभार).

चित्र 13. फिलाडेल्फिया कलासंग्रहातील रोमच्या किल्ल्याचे एक जुने चित्र. हे चित्र बघून मला गेल्या वर्षीची रोम-भ्रमंती आठवली.

खालील चित्र 14-15. टायबर नदीवरील पूल, किल्ला वगैरे.





चित्र 16. रोममध्ये फिरताना अचानक रस्त्याकडेला झाडोऱ्यात बेवारशी उभा असलेला ब्रॉन्झचा पूर्णआकृती योद्धा बघून चाटच पडलो. (पूर्वीचे ग्रीक योद्धे डोईवर शिरस्त्राण, पण बाकी शरीर नागडे, असे युद्धावर जायचे का ? -- जाणकारांनी प्रकाश टाकावा).
चित्र 17-20 रोममधील कोलोना प्रासाद Palazzo Colonnahttps://www.galleriacolonna.it/en/



    
रोमच्या इतिहासातील निवडक मातब्बर घराण्यांपैकी असलेले ‘कोलोना’ घराणे चौदाव्या शतकापासून या भव्य प्रासादात आजतागायत वास्तव्य करून आहे. हा प्रासाद पर्यटकांसाठी फक्त शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ याच वेळात खुला असतो. पुनर्जागरण काळातील वास्तूंची भव्यता, ऐश्वर्य आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी कोलोना प्रासाद अवश्य बघावा.
खालील चित्र 21 Gaspard Dughet (1615 – 1675) चे एक चित्र. या चित्रकाराने रंगवलेली रोम- परिसरातली बरीच निसर्गचित्रे इथे आहेत. ती बघायला मुद्दाम इंग्लंडातून आलेल्या एका वृद्ध जोडप्याशी इथे ओळख झाली.


चित्र 22-23.  कोलोना प्रासादातील काही चित्रे



खालील चित्र २४. ... गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा...
किंवा "... काहे  दिया परदेस, टुकडे को दिल के...." या प्रसंगावरचे रोमन शिल्प.



चित्र 25. रोमच्या आधुनिक कला संग्रहालयातली एक लक्षवेधी कलाकृती.


चला आता पॅरिसकडे ..
पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आणि मोनालिसाभोवती गर्दी करणाऱ्यांना ठाऊक नसलेल्या, केसरी-वीणा वगैरेंच्या खिजगणतीत नसणाऱ्या अनेक शांत, रम्य जागा आहेत. उदाहरणार्थ:
चित्र 26. पार्क द सो Parc de Sceaux मधील एक दृश्य.
".... ते बघितलेस ल्युशियस कतालियस जुलियानस क्लॉडियस अनातोलियस ? अडीच हजार वर्षांपूर्वी आपणही असेच मुक्तपणे धावायचो, हवे तिथे जायचो. आता शतकानुशतके शिळा बनून उन्हा-पावसात कायम उभे रहाणे कपाळी आले आहे ...."

चित्र 27. पार्क सँक्लू मधील प्राचीन कारंजे Parc de Saint-Cloud


चित्र 28-29. नोत्रदाम पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या लहानश्या बागेत जरा विसावा घेऊन संध्याकाळ नदीकाठी फिरत घालवावी ...



एकदा असेच एका अनोळखी पायवाटेने निरुद्देश फिरताना एक वळण आले, आणि -
"... नयन वळविता सहज कुठेतरी, एकाएकी तूच पुढे ... आज अचानक गाठ पडे..."
---  म्हणजे काय, हे साक्षात अनुभवले.
https://www.youtube.com/watch?v=0dSTTUBbo0Q

 
चित्र 30-31. 'फ्रेन' Fresnes परिसरातली फारशी वर्दळ नसलेली एक कच्ची पायवाट.
आणि मायदेशी परतण्यासाठी चंबुगबाळे आवरताना : " आबा, मी पन तुम्च्या बब्बल एनाले "

चित्र 32.

आणखी अशाच काही अनवट जागांची ओळख पुढे कधीतरी....